"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"
अनेकदा एखाद्या कार्यक्रमाला येणारा पाहुणा हा सभागृहात येत असताना पहिले व्यासपीठाकडे पाहतो. तेथील अरेंजमेंट वगैरे, नंतर इतर आपल्या ओळखीतील पाहुणे मंडळी कोण आले आहेत हे पाहतो व उरलेली मान मरातब घेऊन तो सभागृहात प्रवेश करत असतो. पण हा व्यक्ती वेगळा आहे. तो आला, त्याची नजर सभागृहातील आम्हा विद्यार्थ्यांकडे पहिली गेली, नमस्कार करून त्याने छान हास्य केलं, त्याचं हसणं सुद्धा खूप काही आपलंसं करणारं होतं. तो आला म्हणून सगळे उभे राहिले. इतक्यात तो म्हणाला "अरे उभे राहू नका , प्लिज बसा" आणि व्यासपीठावर येऊन बसण्याच्या अगोदर पुन्हा एकदा निरखून सर्वांना हात जोडून त्याने नमस्कार केला. अनेकदा आपल्याकडे 'हात जोडून नमस्कार' हे वाक्य एका वेगळ्या अर्थाने वेगळ्या वेळी म्हंटलं जातं. पण त्याचा हा 'हात जोडून नमस्कार' प्रत्येक उपस्थिताच्या मनावर राज्य करणारा होता कारण तो अप्रत्यक्षरीत्या संवाद साधणारा, आपलेपणाची भावना व्यक्त करणारा होता.
काही दिवसांपूर्वी पार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयातील दर्पण मिडीया क्लबच्या वतीने 'मिडीया मॅरेथॉन' या चार दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सबंध माध्यम क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन हे या चार दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना लाभले. कार्यशाळेविषयी माहिती कळल्याबरोबर मी आवर्जून त्यात सहभागी झालो. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी सबंध दिवसभर त्याचं व्याख्यान होतं. कारण व्यक्तिच तशी होती आणि आहे. त्याचं नाव अनेकदा वाचनातून, कानावरून वगैरे गेलं होतं. पण आता प्रत्यक्ष अनुभवायचं होतं. तो व्यासपीठावर विराजमान झाला. आयोजकांनी त्याची ओळख करून दिली. मुळात ओळख या शब्दाला तो बांधील नाहीये. इतका तो विशाल आहे. एका साचेबद्ध चौकटीत आपण त्याला ठेऊ शकत नाही. 'जणू शाईच्या प्रत्येक थेंबातून व्यक्त होणारा तो म्हणजे राजू परुळेकर.'
या ठिकाणी मी त्याला सर म्हणणं अपेक्षित आहे. पण सर म्हणून मी जर उल्लेख केला तर तो माझा राहणार नाही. त्याच्या आणि माझ्यात एक दरी निर्माण होईल. कदाचित ही दरी वयाची असेल, पण मला ती होऊ द्यायची नाही. म्हणून याच दरीवरचा पूल म्हणून मी त्याला 'तो' म्हणूनच संबोधेन.
निवेदकाने त्याला व्याख्यानासाठी सुरुवात करण्यास सांगितली. त्यावेळी त्याला विचारण्यात आलं. "बसून बोलणार की पोडीयम जवळ उभं राहून !" तो लगेच पोडीयम जवळ आला आणि म्हणाला "आतापर्यंत बसूनच जगलो असतो तर अनुभव शब्दात मांडता आले नसतेे, उभं राहून व्यक्त होण्याची सवय असल्यामुळेच शब्द देखील अनेकांना पटू लागेलत" त्याने सुरुवात केली. कार्यशाळेच्या पूर्व व उत्तर अश्या दोन्ही सत्रात त्याने मार्गदर्शन केलं. आजवर अनेक व्यक्ती पाहिल्या, ऐकल्या, वाचल्या पण निर्भीडपणे बोलणारा, मनसोक्त संवाद साधणारा हा पहिलाच पाहिला. या सबंध कार्यशाळेत प्रत्येक वक्त्याने सांगितलेले महत्वाचे मुद्दे मी वहीत लिहून ठेवत होतो. पण तो ज्यावेळी बोलायला लागला तिथपासून ते शेवटपर्यंत पेन तसच माझ्या हातात होतं. काहीच लिहू शकलो नाही कारण एकही वाक्य, शब्द ऐकायचा राहून जाईल याचीच भीती होती. त्याच्या प्रत्येक शब्दात एक वेगळाच विचार होता. संपूर्ण व्याख्यानात तो सतत हसतमुख चेहऱ्यातच होता. कधीही रागीट, दुःखी, भाव त्याच्या चेहऱ्यावर एकदाही आले नाहीत. दोन्ही हातांची हालचाल करून तो संवाद साधत होता, प्रत्येक श्रोत्याशी तो संवाद साधत होता. सभागृहात समूह जरी असला तरी प्रत्येक श्रोत्याला तो आणि मी दोघेच तिथे आहोत असाच अनुभव येत होता. त्याने खूप वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले. ज्या घडून गेलेल्या आहेत व घडत आहेत. मला त्या व्याख्यानातून काय मिळालं तर एक वेगळी दिशा आणि विचार मिळाला. आतापर्यंत मी कोणत्याही गोष्टीवर एका ठराविक साच्यातच विचार करायचो. पण राजूमुळे माझा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, त्यावर विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. राजूमुळे माझे विचार बदलले. मी वेगळया प्रकारे विचार करायला लागलो आणि त्यातून मला समाधान देखील मिळून गेलं. तो पहाटे पाच वाजता झोपतो आणि साडे नऊला उठतो. इतक्या वेळेत म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत तो काय करतो, तर रात्रभर फक्त पुस्तकं वाचत असतो. त्याच्याविषयी जितकं लिहू तितकं कमीच आहे.
राजूचं व्याख्यान झालं. आभार प्रदर्शन झालं, त्याने तिथलाच एक माईक हातात घेतला आणि म्हणाला. "अरे तुम्हाला फोटो वगैरे काढायचे का माझ्यासोबत!" इतके व्याख्याते आजवर पाहिले पण स्वतः 'फोटो काढायचा का माझ्यासोबत' असं म्हणणारा पहिला व्याख्यात्या असणारा माणूस पाहिला.
'डाऊन टू अर्थ' असं आजच्या सो कॉल्ड भाषेत म्हणणं देखील त्याच्यासाठी अपुरं आहे. घरी येईपर्यंत प्रवासात, विचारांत फक्त राजूच होता. दोन दिवस त्याच्या वशातच मी होतो. फेसबुकवर त्याचं पेज आहे. 'राजू परुळेकर फॅन' नावाचं. तिथे त्याला फॉलो करायला लागलो. दररोज तो वेगवेगळ्या गोष्टी - घटनांविषयी लिहीत असतो. पण का कोण जाणे, त्याचं इत्यंभूत असं प्रत्येक लिखाण हे 'अरे माझं पण हेच म्हणणं आहे' हे असच मी म्हणतो. त्याच्या प्रत्येक विचाराशी मी पुरेपूर सहमत असतो. राजू खरच खूप ग्रेट आहे. कारण त्याच्याविषयी व्यक्त होऊ तितकं कमीच आहे.
शेवटी इतकंच सांगावसं वाटतं की माझ्यासाठी तो कोण आहे, तर "राजू परुळेकर हा व्यक्ती नसून एक विचार आहे. जो जगायला आणि जगवायला शिकवतो".
खूप छान.....!!✌👌👍
ReplyDeleteThank you shradhha
Deleteधन्यवाद जी
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteफार सुंदर "राजू परुळेकर" गाथा. शुभेच्छा आहेतच!
ReplyDeleteAprtim khup chhan
ReplyDeleteAprtim khup chhan
ReplyDelete