"छायाचित्र विरुद्ध DSLR"

          गणपती अवघ्या काही दिवसांवर आले असताना. नेहमीप्रमाणे आईने घराच्या साफसफाईसाठी लागणाऱ्या मदतीचे कॉन्ट्रॅक्ट मला दिले. बदल्यात गणपतीत जास्तीचे उकडीचे मोदक खाऊन देण्याचं वचन देखील दिलं. साफसफाईला सुरुवात झाली. केरसुणीसारखं शस्त्र हातात घेऊन (होय शस्त्रच कारण याच शस्त्राने आमच्यावर लहानपणी खूप अन्याय केला आहे), तोंडाला संरक्षक म्हणून रुमाल बांधून आम्ही लढाईस सज्ज झालो. काही काळ लढाई करता करता पोटमाळ्यावर एक खजिनारूपी पत्र्याची भली मोठी पेटी हाती लागली. त्याच्यावर असणारी धूळ साफ केली आणि ती उघडण्याचा प्रयत्न करू लागलो. ती तिथेच कशीबशी हळूच आवाज न करता उघडली. कारण खाली आणून उघडली असती तर मातोश्रींकडून जास्तीच्या बंदुकीच्या फैरी आमच्यावर झाडल्या गेल्या असत्या. म्हणून वरच ती उघडली. पणजोबा, आजोबा यांच्या काळातील राखून ठेवलेल्या काही महत्वाच्या गोष्टी त्यात होत्या. त्यातच एक सर्वात महत्वाची गोष्ट होती ती त्या काळातील म्हणजेच पणजोबा आजोबा यांच्या काळातील असणारा 'छायाचित्रांचा संग्रह'. माफ करा, 'फोटो अल्बम' असं म्हणतो म्हणजे लवकर कळेल. मग लढाईची सर्व शस्त्र  व  संपूर्ण लढाई बाजूला ठेवून मी या फोटोंत आता विसावा घेऊ लागलो. तसा नावाला हा फोटो अल्बम होता कारण सर्व फोटो हे सुटे व जीर्ण झाले होते. परंतु कितीही जुनाट अवस्थेत ते असले तरी खूप वेगळा अर्थ आणि विचार सांगणारे असे ते फोटो होते. अश्याच एका विचारात मी हरवून गेलो. तो विचार होता आजच्या सो कॉल्ड 'सबंध फोटोग्राफी क्षेत्राचा.'
         पेटीत मिळालेल्या अल्बममध्ये मला काही फोटो दिसले. हे फोटो पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट होते. एका फोटोत पणजोबा करकरीत धोतर , कोट घालून तुरा निघालेला फेटा बांधून एका लाकडी खुर्चीवर आपल्या हातातल्या काठीवर हात ठेवून ताठपणे बसलेले आहेत, दुसऱ्या फोटोत आजोबा एक पुस्तक वाचत बसलेले आहेत. एका फोटोत अगदी कपाळापर्यंत वैगैरेे पदर घेऊन नाकात चमचमती नथ घालून एका मोठ्या स्टूल वर हाथ ठेवून पणजी आजी उभी आहे आणि त्या हाताजवळ एक छान भलीमोठी फुलदाणी आहे एका फोटोत बाबा त्यांच्या कॉलेजात एका स्पर्धेत मिळालेलं भलंमोठं ते बक्षीसाचं पदक घेऊन उभे आहेत, एका फोटोत आजी विणकाम करत आहे एका फोटोत छान कडकडीत तेल थापून केसांची लांबलचक दोन वेण्या घालून त्या पांढऱ्या रिबिनने बांधून हातात टेनिस रॅकेट घेऊन टेनिस खेळाचा पेहराव करून आत्या उभी आहे. यांसारख्या निरनिराळ्या फोटोंचा संग्रह यात आहे हे फोटो पाहून वाटलं किती वेगळं होत ना हे जग. आजच्या सो कॉल्ड शब्दांत सांगायचं तर वेगवेगळ्या पोज असणारे असे हे फोटो खरंच वेगळे होते. हे फोटो त्या, जुन्या पण अजरामर अशा पोज खूप काही बोलतात. एका विशिष्ट वेळी आपण कॅमेऱ्यात तो क्षण कैद करतो आणि आयुष्यभरासाठी कधीही हे फोटो पाहिले तर काही काळ का होईना हा सुखावणारा ठरतो. पण आज असं बिलकुलच वाटत नाही. थोडं फेसबुक, व्हॉटस् ॲप, इन्स्टाग्राम या गोष्टी चाळल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं. लाल भडक लिपस्टिक लावून प्रचलीत पाउट नावाची (तोंड वेडंवाकडं करणे) करून पोज देऊन, केसांत हाथ घालून सबंधं शरीर वेडंवाकडं करून, बॅकग्राऊंडला वेगवेगळी चित्र एडीट करून एडीटने डोळे वगैरे चमकवून, गळ्यात सोनं वाटावं अशा साखळ्या वैगरे एडीट करून, भले मोठे विचित्र रंग त्या फोटोत लावून, वरचढ म्हणून 'सबके दिलकी धडकन, आमचे दादा, भाऊंनी घातला गॉगल पोरी झाल्या पागल' यांसारख्या अर्थहीन उगाचची सो कॉल्ड वाक्यं त्यावर लिहून किंवा कॅप्शन वगैरे देऊन तसेच काही मोबाईल ॲप आहेत ज्यांमधून डोक्यावर फुलं वगैरे आणून, प्राण्यांसारखे कान, जीभ, नाक, दात आणून यांसारखे असे निरनिराळे फोटो हे सोशल मीडियावर सर्रासपणे अपलोड होत असतात. यात काही गैर आहे असं मी मुळीच म्हणू शकत नाही. कारण ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. एखाद्याला आवडत असेल कुत्र्यांसारखं नाक, कान  आलेले फोटो काढायला किंवा इतका छान चेहरा देवाने दिला असताना स्वतःहून तो विक्षिप्त करून फोटो काढलेला. त्याला आपण तरी काय करणार. 
        काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेले. संशोधन अधिक जास्त गतीने होत आहे. याच संशोधनाच्या गतीत कॅमेरा नावाची गोष्ट देखील आली. जुन्या काळातील भल्या मोठ्या कॅमेरांपासून ते आजच्या हाय क्लास 'डी.एस.एल.आर.' किंवा एचडी मोबाईल कॅमेरांपर्यंतचा प्रवास हा मोठा आहे. सातत्याने आकारमान, आधुनिकीकरण हे कॅमेऱ्यात व त्याच्यासोबतच्या यंत्रांत होत गेले. चित्रपटात एका खोलीत सबंध लाल रंगाचा प्रकाश असतो. तिथे असणारा चित्रपटाचा नायक हा फोटो प्रिंट साठी त्या ठिकाणी विशिष्ट प्रक्रिया करत असतो. कुतूहलाने वडीलधाऱ्यांना मी त्या एकंदर प्रकाराविषयी विचारायचो. पण आज मायक्रो एसडी कार्डविषयीसुद्धा लहानग्यांना सांगावं लागत नाही. शेजारचं नुकतच बोलायला चालायला लागेलेलं लहान मूल हा त्याच्या बाबांचा मोबाईल घेऊन सेल्फी काढतो. इतकं जग पुढे गेलेलं आहे आणि त्याचे सर्वश्रेष्ठ बाबा यावर लगेच  अभिमान असल्यासारखे म्हणतात "बघा, सगळं माहितीये आमच्या सोन्याला, अगदी हुश्शारच आहे". एक काळ होता ज्या काळात फोटोग्राफर इतके व्यस्त असायचे की काही कार्यक्रम असेल तर आवर्जून काही दिवस अगोदर त्यांच्याकडे जाऊन नोंद करावी लागायची. पण आज जागोजागी फोटोग्राफर जन्माला आलेले आहेत. २०१२ ते आजतागायत २०१७ पर्यंतच्या काळात ऊठ सूट जो तो 'डीएसएलआर' विकत घ्यायचाय म्हणून शेमडं पोरगं सुद्धा आपल्या घरी हट्ट करतोय. ज्यांना इंग्रजीतील फोटोग्राफीची सुरुवात 'P' का 'F' या आद्य अक्षराने होते हेही माहीत नाही असे जेव्हा कॅमेरा विकत घेतात तेव्हा त्यांचं खरच अप्रूप वाटतं. वरून असे नवखे फोटोग्राफर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अतिशय भडक अक्षरात त्यांच्या फोटोंवर स्वतःचं नाव लिहितात. आजच्या भाषेत आपण त्याला वॉटर मार्क किंवा टॅग मार्क असं म्हणवून घेतो. अश्यांना फोटोपेक्षा आपल्या नावाचा लोगो हा त्या फोटोवर ठळकपणे दाखवायचा असतो. आता तर काही लोकं "वारीला जातोय" असं आनंदाने सांगतात तसं शूट ला जातोय असं अभिमानाने आजचे तरुण सांगतात. जणू आज काल हा एक इव्हेंटच बनून गेलेला आहे. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग ही त्याचीच पिलावळ असं आपण म्हणू शकतो. यातलीच अतिशयोक्ती म्हणजे 'प्रेग्नेंट टाईम' शूट. याबद्दल न बोललेलच बरं. शंकराला जसा तिसरा डोळा आहे तसं आज आपण कॅमेराला 'थर्ड आय' म्हणून संबोधतो. पूर्वी मोठ्या अश्या कॅमेऱ्याच्या अलीकडे तो फोटोग्राफर काही यांत्रिक दृष्टीने काळ्या रंगाच्या कपड्याच्या आतून फोटो काढायचा व फोटो किती योग्य येईल याचाच प्रयत्न करायचा आज मॅन्युएल ऑटो सेटिंगशी खेळताना काही जण 'मी आणि माझ्या कॅमेऱ्याची क्लिॲरीटी, किंमत, कंपनी हेच नकळतपणे दाखवून देत असतो.
           काळानुसार तंत्रज्ञानासोबत माणसाने नक्कीच बदलायला हवं. आज अनेक फोटोग्राफर आहेत ज्यांची फोटोग्राफी खरंच अप्रतिम वाखनन्यासारखी आहे. कारण त्याने काढलेल्या फोटोंतून तो फोटोग्राफर त्याची कला ही बोलती करत असतो. प्रत्येक क्षण मनाला आपलासा होईल असा फोटो तो निर्माण करत असतो. फोटोग्राफी आहे तिथेच आहे. फक्त आपण त्याच्यातला क्षण अनुभवायचा विसरलोय. व्यक्तीपेक्षा एडिटिंग किती चांगलं आहे हेच प्रत्येक जण दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. कोणतीही कला प्रत्येकाने जरूर आत्मसात करावी पण त्या कलेतील मूळ गुण मात्र हरवू देता कामा नये. नाहीतर ती कला ही कला राहत नाही. भले आज पाउट सारख्या अनेक विक्षिप्त पोजेस, भडक रंगाने एडिट केलेले फोटो काढले जात असतील पण आजचे सो कॉल्ड 'डीएसएलआर' इफेक्ट किंवा फोटोशॉप इफेक्ट फोटो हे फक्त फेसबुक, इंस्टावर लाईक, कमेंट मिळवण्यापुरतेच. जुन्या फोटोंतील फुलदाणी, पुस्तकांचा संग्रह , स्त्रीचा तो पदर, तिची नथ, आजोबांच्या फेट्याचा तुरा, त्यांचा कोट, ती लाकडी आराम खुर्ची यांची जागा आजचे भडक फोटो कधीच घेऊ शकत नाहीत. 
         इतक्यात बाजूने सुळकन एक उंदीर पोटमाळ्यावरचीच एक गोष्ट पाडून खिडकीतून बाहेर पळून गेला आणि मी भानावर आलो. खालून आईची हाक ऐकू आली "अरे तुला त्या बाजूच्या सावंतांच्या हेमंतचं कळलं का?" मी म्हणालो "नाही, का काय झालं त्याचं ?" आई म्हणाली "अरे त्याचं लग्न मोडलं ना रे, म्हणे फोटोत मुलगी वेगळी दिसायची आणि प्रत्यक्षात तर वेगळीच दिसायला लागली" आईने दिलेल्या या माहितीवर मी हसू की रडू हेच कळत नव्हतं. इतकंच केलं, हातातल्या त्या जीर्ण पण अधिक आनंद देणाऱ्या फोटोंवरची धूळ साफ केली, तो फोटोंचा अल्बम होता तिथे जागच्या जागी व्यवस्थित ठेवून दिला आणि ती  खजिनारुपी पेटी बंद केली.

Comments

  1. फारच सुंदर आमच्या पीढी पर्यंत पोटमाळे आणि पितळी किंवा लाकडी पेट्या होत्या,ज्या तुमच्या लेखासारख्या जूना काळ फिरवून आणायच्या 🏵🏵

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माझा कॉलेजचा पहिला दिवस

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"