"वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय, विरोध करा पण विनयाची कास सोडू नका"
"वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय, विरोध करा पण विनयाची कास सोडू नका"
ट्रेनने ठाण्याला येत होतो. सध्या वंदे मातरम् वरून मुद्दा गाजतोय. वेळ जपावा म्हणून त्याच्यावरच
वाचत विचार करत असताना, पुढल्या स्टेशनला, बाजूला एक
त्रिकोणी मुस्लिम कुटुंब बसायला आलं, आई वडील हे त्या कुटुंबाचाच एक लहान सदस्य असणाऱ्या आपल्या मुलाचे छान लाड करत होते. इतक्यात ट्रेनमध्ये पॉपकॉर्न विकणारी बाई
चढली त्या लहान मुलाच्या पित्याने त्या बाईला आवाज दिला "ओ मावशी". मावशी असा आवाज दिल्यामुळे माझं
कुतूहल अधिक जागं झालं. त्याने त्या बाईकडून
पॉपकॉर्न विकत घेतले आणि आपल्या लहान मुलाच्या हातात दिले. हसत खेळत असताना त्या मुलाचे वडील म्हणाले, "अपने आईको दे" त्या लहान मुलाने त्याच्या आईला एक पॉपकॉर्न
दिलं. नंतर ते पुन्हा म्हणाले "अब
अपने बाबाको दे" त्या लहान मुलाने त्याच्या वडिलांनापण दिलं. आई आणि बाबा हे शब्द मला त्या
कुटुंबाविषयी अधिक विचार करायला लावणारे ठरले. कारण मुस्लिम कुटुंबात आईला अम्मी आणि वडिलांना अब्बू
असं संबोधतात. पण त्या मुस्लिम कुटुंबाच्या संवादात आई
आणि बाबा अशी शिकवण होती. आई-बाबा काय आणि अम्मी-अब्बू काय! भारतात कुठेही जा, नातं ते शाश्वतच आहे. इथे धर्म बाजूला ठेवा, आणि त्या तिघांच्या नात्याचा विचार करा. भारतीय संस्कृतीत हीच विविधता आहे. अनेक भाषा
आणि संस्कृती इथे हातात हात घालून नांदतात. कोणी कोणत्याही धर्माचा असो आजच्या काळात प्रत्येक जण हा एकमेकांच्या संस्कृतीत सरमिसळ होत
गेलेला आहे. मग ती खाद्य संस्कृती असो की पेहराव संस्कृती. प्रत्येक जण हा याच विविध संस्कृतीसोबत भारताच्या जाडजूड अश्या देशाभिमान कडीने अधिक घट्ट
जोडला गेलेला आहे. धर्म- जात यांविषयी अभिमान हा जरूर असावा पण तो घराच्या उंबऱ्याच्या आत. बाहेर फक्त सगळे एकाच छताखाली ते छत म्हणजे भारतीय, भारतमातेचे पुत्र म्हणू्न. म्हणजेच वंदे मातरम्. 'परंतु सध्या वारीस पठाण, अबु आझमी यांसारखे काही नेते "चाहे हमे भारत देश क्युना छोडना पडे फिर भी हम वंदे मातरम्
नही कहेंगे" असे म्हणत आहेत. आता त्यांची बौद्धिक
कुवत दुय्यम दर्जाचीच आहे म्हणा. परंतु हा वेगळा मुद्दा आहे. ज्या भावनेने लिहावंसं वाटलं तो महत्वाचा मुद्दा हा आहे, की ही घटना घडल्यानंतर दररोज अतिशय फालतू
लिहिणारे, काडीचे सुद्धा सावरकर, लोकमान्य न कळलेले, प्रामुख्याने स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक ज्यावेळी या घटनेविषयी लिहिताना
"सबंध ईस्लाम धर्म हा असाच वाईट आहे, किंवा मुस्लिम लोकांना बुद्धी नाही
त्यांना भारताविषयी मुळीच अभिमान नाहीये" या
सारखं अर्थहीन, संवेदनशील लिखाण करतात. त्यावेळी त्यांच्या बुद्धीची कीव येते.
आमच्यासोबत शाळा कॉलेजात अनेक मुस्लिम मित्र होते. मधल्या सुट्टीत परवेज आणि मी एकत्र बसून घरून आणलेले डब्बे
एकमेकांशी शेअर केले, झोया या मुस्लिम मैत्रीणीने तिला भाऊ नाही म्हणून रक्षाबंधनला मला राखी
बांधली, गणपतीला आरतीसाठी यासिन घरात पहिला हजर, फरा नेहमी प्रत्येक रमजानला न विसरता
डब्बा भरून शीरखुरमा घेऊन येते, प्रत्येक सणाला आई दुसऱ्या मजल्यावरच्या
आतिफला त्याला आवडतात म्हणून गरम गरम पुरणपोळया
खायला घरी बोलावते, ट्रेन मध्ये गर्दी असल्यावर मित्र अमीर उठून पहिले कोणत्याही स्त्रीला
जागा देतो. पण एवढं असून कॉलेजात डब्बा शेअर करणाऱ्या
परवेजने कधीच विचारलं नाही तू हिंदू आहेस का! किंवा ना मी त्याला विचारलं तू मुस्लीम आहेस का! झोया ने मला राखी बांधताना कधीच विचार नाही केला की
राखी बांधून घेणारा भाऊ हिंदू आहे का! गणपतीला आरतीला येणाऱ्या यासिनने कधीच विचार नाही केला की मी गणपतीची आरती कशी म्हणू! फराने रमजानला
शिरखुर्म्याचा डब्बा देताना कधीच विचार नाही केला की हा हिंदू आहे मी याला का देऊ! आईने कधीच विचार नाही
केला की आतिफ हा मुस्लिम आहे त्याला का पुरणपोळी देऊ!
ट्रेन मध्ये गर्दी असल्यावर एखाद्या स्त्रीला जागा देणारा मित्र अमीर कधीच त्या स्त्रीला विचारत नाही की तू हिंदू आहेस की मुस्लिम! मुद्दा हा
आहे, की यांसारखे अनेक मुस्लिम मित्र मैत्रिण आहेत माझे, जे कधीच हिंदू किंवा मुस्लिम या भावनेने
समाजात वावरत नाहीत. तर भारतीय या एकाच
अभिमानाने ते समाजात वावरत असतात. आणि याच भारतीय संस्कृतीने दिलेल्या माणुसकी या तत्वाने ते जगत असतात. आणि वंदे मातरम्' असं अभिमानाने म्हणत असतात.
वंदे मातरम् न म्हणणारे काही देशद्रोही नेते
हे जुना इतिहास उकरून काढून, देश आणि धर्माच्या नावावरून प्रसिद्धीत येऊन
स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि यात अनेक तरुणांची माथी भडकू पाहत आहेत. वाईट याचं वाटतं की या नेत्यांनी सोडलेली ही वादग्रस्त
वक्तव्यांची पिलावळ इतकी माथेफिरूंना जागं करते की यांना विचारावंसं वाटतं की आपल्याला संपूर्ण अस्खलित वंदे मातरम् म्हणता येतं का! कधी १५ ऑगस्ट किंवा २६
जानेवारीला ध्वजरोहनाला न जाता विकेंड सेलिब्रेट करणारी, देशासाठी काहीच
योगदान न देता स्वतःला सो कॉल्ड अभिमानाने भारतीय म्हणवणारी ही माथेफिरू लोकं लगेच इस्लाम धर्माला आणि मुस्लिम लोकांना नावं ठेवतात. अरे जरा
तरी विचार करा. घटना काय आहे आणि आपण लिहतोय काय. कृपया स्वतःच्या स्वार्थात धर्म आणि देश यांना ओढू नका. यापूर्वी ही दोन्ही धर्मातील लोकांनी
याची खूप मोठी किंमत मोजलेली आहे.
या लोकांना एकच सांगायचंय की "विषय गाजतोय म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी घटनेच्या झोतात काहीही
अर्थहीन, भावना भडकवणारं लिहू नका. नाहीतर तुमच्यावर झालेल्या संस्काराबद्दल
आम्हाला शोक व्यक्त करावा लागेल. शेवटी आदरणीय पु.लं देशपांडे यांचं एक वाक्य इथे आवर्जून सांगावसं वाटतंय ते म्हणजे "कोणत्याही गोष्टीला
विरोध जरूर करावा, पण विरोधाने विनयाची कास कधीच सोडता कामा नये"
Nice
ReplyDeleteTHANK YOU SWAPNIL
Delete