“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”




       भारतीय हिंदू शास्त्राला एक अजस्त्र असा दीर्घ इतिहास आहे. वेद, शास्त्र, पुराणे यांच्या भक्कम आधारावर हिंदू धर्म आजतागायत अविरत बलाढ्यपणे उभा आहे. असे आपण अभिमानाने म्हणत असतो. समाजातील अनेक घटकांना आपण हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून संबोधत असतो. आदिमानव म्हणजेच सर्व परिचित अश्या अश्मयुगीन काळापासून हिंदू धर्मातील देव देवतांचे प्रतीक म्हणून मानला जाणारा घटक म्हणजे निसर्ग. पूर्वीचा मानव हा निसर्गपूजक होता. निसर्गातील प्रत्येक घटकाला आदिमानव हा आधारदाता देव मानत असे. पूर्वीचा मानव हा जरी मांसाहार करत असला तरी त्याच्या या निसर्गपूजेत प्राणी देखील येत असत. तो प्राण्यांच्या पालनपोषणासोबत त्यांचा पूजक देखील होता आणि काळ जसजसा सरत गेला तसतशी  त्याची निसर्गपूजा कमी होत गेली. परंतु यातील एक महत्वाचा पूजेचा घटक अजूनही जिवंत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या तीन चार वर्षांपासून तर त्याची महती प्रत्येक स्तरावरील लोकांना एका वेगळ्या मुद्द्यामुळे निश्चितच माहित झालेली आहे. हा घटक म्हणजे गोमाता, म्हणजेच गाय हा प्राणी. "३३कोटी देवांचा अधिवास जिच्या उदरात आहे, अशी ती गाय" असा उल्लेख पुरातन काळापासून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.     २०१४ च्या निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होऊन संपूर्ण भारतीय राजकारणात एक अमूलाग्र क्रांती झाली. हिंदुत्ववादी धोरण असणारे असे भाजप सरकार हे सत्तेवर आले व गोपूजक असणारे व हिंदुधर्माचा प्रचंड अभिमान असणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर अनेक नवनव्या योजना त्यांनी अमलात आणल्या, परंतु या सर्वांमध्ये त्यांनी गोमातेचा मुद्दा अधिक धरून ठेवला. संबंध भारतात त्यांनी गोमांस व गोहत्या बंदी लागू केली. त्यानंतर यामुळे अनेक वादविवाद हे निर्माण झाले. छुप्या रीतीने गोमांसाची तस्करी होत होती. अद्यापही होत आहे. स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे अनेक स्वयंघोषित गोरक्षक हे कायदा हातात घेऊन समाज विघातक कृत्ये करू लागली. परंतु इथे एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गोरक्षकता ही फक्त गोमांस किंवा गोहत्या इथपर्यंतच मर्यादित राहते का ? जर ती गोमांस पुरतीच मर्यादित राहत नसेल तर मग "रस्त्यावर  फुटपाथवर भर उन्हात उपाशी उभ्या असलेल्या त्या गाईंचे काय?"
      जनपथ म्हणजेच फुटपाथवर शहरातील नागरिकांना सोयीस्कररित्या चालण्यासाठी प्रशासनाने फुटपाथची सोय उपलब्ध केलेली असते. परंतु याच अनेक फुटपाथवर एक बाई दोन गाई व त्यांच्या वासरांना घेऊन आपला ठाण मांडते. गाईला किंवा तिच्या वासरांना जर तुम्ही पेंढा, चारा किंवा गूळ,खोबरं, तीळ यांच्या मिश्रणाचा लाडू जर भरवला तर तुम्हाला पुण्य लाभते. या समजेतून अनेक जण तो लाडू किंवा चारा हा दहा किंवा त्याहून जास्त रुपयाला त्या बाईकडून विकत घेऊन गाईला व वासराला खायला देतात त्यांना भरवतात. तसेच अनेक जण शिळं अन्न हे त्या गाईला ती गाय बाळगणाऱ्या त्या संबंधित व्यक्तीला पैसे देऊन भरवतात. तसेच अनेकजण त्या संबधित व्यक्तीकडून पैसे देऊन गोमूत्र विकत घेतात. इथे कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नसून मुद्दा हा आहे की मधल्यामध्ये त्या मुक्या प्राण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. एखाद्याने त्या गाईला तो चारा किंवा लाडू भरवला तर ती लगेच खाते. हे पाहून प्रत्येक देणेकऱ्याला समाधान वाटतं. परंतु याविषयी अधिक माहिती मिळवली असता असे आढळून आले की त्या तत्सम गाईला रात्रभर उपाशी ठेवले जाते कारण सकाळी येणाऱ्या गिऱ्हाईकाने आपल्या जवळचा चारा विकत घेऊन गाईला भरवावा व तिने तो खावा व देणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळून पुढल्या वेळेस त्या गिऱ्हाईकाने पुन्हा आपल्याकडे यावे. इतका हा प्राण्यांच्या बाबतीत बाजारूपणा झालेला आहे. तसेच कित्येकदा त्या गाईला ऊन असो की पाऊस तसेच रस्त्यावर- फुटपाथवर बसून न देता उभच ठेवलं जातं. अनेकदा या गाईंमध्ये उच्च प्रतीच्या जर्सी जातीच्या गाई आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रकार ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या त्या ठिकाणी त्या गाईशी संबंधित व्यक्ती ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर व्यवस्थितपणे साफसफाई देखील करत नाहीत. याचा त्रास फुटपाथवरील पादचाऱ्यांना तसेच मंदिराबाहेरच जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना होत असतो.
      आपल्या गाईसोबत पेंढचारा वगैरे घेऊन फुटपाथवर किंवा मंदिराच्या बाहेर बस्थान मांडून बसलेल्या अनेक व्यक्ती आज आपल्याला मुंबई ठाणे यांसारख्या सुशिक्षित शहरात पाहायला मिळतात. परंतु या विरोधी कोणताही पालिका विभाग हा कारवाई करताना आढळत नाही. संबंधित गाई कुठून आल्या? त्या गाईच्या जीवावर व्यवसाय करणारी ही माणसं कोण? ती गाय आणि ते वासरू त्या व्यक्तीच्याच असतात का? त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी ही वेळोवेळी होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. एके ठिकाणी गोमतेला धर्मात उच्च स्थान द्यायचं, गो हत्या  झाली किंवा गोमांस मिळाले तर त्याविरोधी कारवाई करायची. पण मग जिवंत असणाऱ्या, त्या भर ऊन- पावसात उभ्या असणाऱ्या गाईचे व तिच्या वासराचे हाल हे प्रशासनाला, तथाकथित गोमातेचा विषय उचलून धरणाऱ्या भाजप पक्षाच्या सर्वच कार्यकारिणीतील नेते व मंत्र्यांना दिसत नाही का ! की मतांच्या बँकेसाठी जाणून बुजून दुर्लक्ष होतंय हाच एक प्रश्न आहे.

Comments

Popular posts from this blog

माझा कॉलेजचा पहिला दिवस

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"