माझा कॉलेजचा पहिला दिवस

                                                                        श्री
               
              नमस्कार ! आज ब्लॉग लिहिण्याची पहिली वेळ. तशी आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हि त्या त्या योग्य वेळेस अनुसरून असते .मी  या सुरुवातीच्या माझ्या ब्लॉग लिहण्याच्या विचारात असताना सुरुवात नक्की कुठून करावी हेच मुळात कळत नव्हतं . तेव्हा एक गोष्ट  सुचली कि, ज्यामुळे आपण ब्लॉग लिहिण्यास प्रवृत्त झालो अश्या गोष्टीने सुरुवात केली तर काय  हरकत आहे. आणि म्हणूनच माझं हे पहिलं  लिखाण म्हणजेच, माझं माध्यम क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी असणारं कॉलेज  मधलं  पहिलं पाऊल. "अर्थातच माझा कॉलेजचा पहिला दिवस"

           कॉलेज म्हंटलं की मजा -मस्तीच्या फुलपाखरांना हवेत झेपावण्याचं ठिकाण,प्रत्येक जण कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी खूप आतुर असतो अर्थात मी देखील होतो पण इतरांपेक्षा अधिक. कारणही तसच होतं . अगोदर फर्स्ट ईअर आणि सेकण्ड ईअर सायन्स करून झालं आणि थर्ड ईअर सायन्सला प्रवेश घ्यायचा होता परंतु रसायानांबरोबर खेळणं मनाला पटत नव्हतं,म्हणून अखेर घरच्यांना सविस्तरपणे समजावून मग घरच्यांनी मला आवडणाऱ्या या नवीन माध्यम क्षेत्रातील शाखेत दाखल होण्यासाठी अंतिमतः परवानगी दिली आणि प्रवेश प्रक्रिया विना अडचण मी पार पाडली .
           आज कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेजची वेळ काही ठरली नव्हती ; तशी ती ठरलेली होती,पण मला नक्की  माहित नव्हती म्हणून मुद्दामून पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून सकाळी ७.२० ला घरातून बाहेर पडलो. कॉलेजमध्ये आल्यावर पहिल्यांदातर  वर्ग शोधायची माझी धांदल सुरु झाली . नव्या बाई नवा वर्ग असं लहानपणी म्हणणं फार छान वाटायचं, कारण त्यावेळी शिक्षक स्वतः वर्गात आणून बसवायचे, कारण तेव्हा लहानपणी वर्ग माहित नसायचा . पण आत्ताचं  चित्र हे फारच वेगळं आहे, परुंतु आता कॉलेजमध्ये आल्यानंतर मात्र आम्हाला शिक्षकांना शोधावं लागतं. माझ्या कॉलेजच्या या पहिल्या दिवशी अगदी तसच झालं, नवा वर्ग कोणता हे शोधण्यासाठी कॉलेजचे दोन मजले चढणे व उतरणे अशी आमची प्रक्रिया चालू होती. अनावधानाने एका वर्गात जाऊन देखील बसलो परंतु पुढल्या बाकावरच्या मुलाकडून कळले कि हा तर थर्ड ईअर कॉमर्स चा वर्ग .तेव्हा  आपली चांगलीच फजिती झाली आहे हि बाब मनात घेऊन सरळ वर्गा बाहेर पडलो, शेवटी एका शिपाई काकांना विचारूनच टाकले कि फर्स्ट  ईअर मास मिडिया मराठी विभागाचा वर्ग कुठे आहे ! तेव्हा काका म्हणाले की  ' हा वर्ग तर दुपारी १ वाजता आहे.' अश्या तऱ्हेने सकाळी  ७.३० ते १०.३०  हा वेळ फक्त वर्ग शोधण्याच्या धावपळीत घालवला  असताना नंतर कळते कि, कॉलेज  हे दुपारी १ वाजता आहे.  तेव्हा हताश झालेला हा चेहरा पहिल्या दिवसाच्या उत्सुकतेत असताना फक्त १ वाजण्याच्या घड्याळ्यातल्या काट्यानकडेच टक लावून वाट पाहण्यास बांधील राहिला. त्यावेळी आमच्या मनातल्या फुलपाखरांचा थवा हवेत उडण्याआधीच शांत झोपून गेला आणि असा हा आमचा कॉलेजचा पहिला दिवस आठवणीतल्या कक्षेत सामावून गेला . 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"