“ शिवस्मारक नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’
“ शिवस्मारक नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’
बदल हा काळानुरूप होत आहे. आणि तो व्हायला देखील हवा. परंतु असाच एक घटक
ज्यात सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून ते आजच्या टेक्नॉसेव्ही जगापर्यंत काडीमात्र
बदल झालेला नाही. हा घटक म्हणजे
अर्थातच राजकारण. तसे राजकारणात बरेच
बदल झाले. परंतु विशेषतः भारतीय राजकारणाच्या बाबतीत भौतिक स्वरूपात हे मोठ्या
प्रमाणावर बदल झाले. पण याच भारतीय राजकारणाच्या
मानसिकतेत मात्र आजवर तिळमात्र बदल झालेला नाही. त्या त्या काळातील
साम्राज्यवाद व त्या साम्राज्यवादाचे नेतृत्व करणारी व्यक्ति , संघटना ही या भारतीय
राजकारणातील निकृष्ट मानसिकतेची उदाहरणे ठरतील . अशीच निकृष्ट
मानसिकतेची जाणीव ही दिनांक १३ मार्च २०१५ तारखेनंतरच्या कालावधीत झाली. यात प्रामुख्याने दोन
घटक होते. एक म्हणजे ‘लेख व्यवस्थित न वाचता त्यात शब्दांची अफरातफर करून पोस्ट करणारे
लोक’ व दुसरे म्हणजे
राजकारण.
टि.व्ही. वर ‘जय महाराष्ट्र’ या मराठी चॅनेलवरील बातम्या पाहत होतो यावेळी “ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात एका गर्भवती स्त्रीला
रुग्णालयाची फी की जी ८०० रुपये होती , ती न भरल्यामुळे रुग्णालयातून तिला बाहेर काढलं
जातं व तिची प्रसूती रस्त्यावर होऊन नवजात अर्भक हे मरून जातं” या घटनेविषयी चॅनेलवर चर्चा चालू होती व दर्शकांच्या प्रतिक्रिया देखील
फोन कॉल द्वारे घेतल्या जात होत्या. मी देखील फोन करून त्याविषयी माझं मत मांडलं. मी दिलेलं मत असं होतं की , “अरबी समुद्रात ३६०० कोटी
रुपये खर्च करून छत्रपती शिवरायांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी आज फडणवीस
सरकारने टेंडर मागवले , आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये कळव्यात एका गर्भवती
बाईला ८०० रुपये भरण्यासाठी नाही आहेत म्हणून बाहेर काढलं जातं आणि तिची प्रसूती
ही रस्त्यावर होते आणि मूल मरतं , त्याच हॉस्पिटलचं नाव असतं ' छत्रपती शिवाजी
रुग्णालय ' . एकीकडे ३६०० कोटी
खर्चून स्मारक तर त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात ८०० रुपये नाहीत म्हणून एका
बाळाचा जीव जातो ... अरे माझ्या राजाला ३६०० कोटीं चं स्मारक हवं आहे कि , आपली सुखी जनता ." हे असे मत मी फोन
करून नोंदवले होते . आपले म्हणणे लोकांनी
वाचावे म्हणून हेच मत मी माझ्या फेसबूक अकाऊंटवर दिनांक १३ मार्च २०१५ रोजी सायं . ७.१७ मीनीटांनी पोस्ट केले . त्यानंतर खूप काळ
गेला व आजच्या तारखेच्या एक आठवडा अगोदर म्हणजेच साधारणतः १७ तारखेपासून " अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाच भूमिपूजन
सोहळा " याविषयी सर्वच
मध्यमांत चर्चा होऊ लागली. प्रत्येक स्तरातून
वैयक्तिक व सामाजिक पातळीवरून प्रतिक्रिया येऊ लागल्या.निरनिराळ्या माध्यमांवर लाईव्ह चर्चा होऊ लागली. निरनिराळे संदर्भ निघू लागले . याच काळात , मी काही दिवसांपूर्वी
याच स्मारकाच्या बाबतीत माझ्या स्वतःच्या फेसबूक अकाऊंटला एक मत नोंदवले होते. जे की सुरुवातीला मी सांगितले आहे. तोच जश्याच्या तसा मजकूर निरनिराळ्या व्हॉट्स अॅप ग्रुप व
व्यक्तींकडून व फेसबूकवर मला माझ्या नावाविना वाचायला मिळाला. अनेक ठिकाणी तोच
मेसेज स्प्रेड होताना पाहायला मिळाला. याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. परंतु याचं
वाईट वाटतं कि, दोन आठवड्यापासून स्प्रेड होणाऱ्या या मेसेजमध्ये काही निकृष्ट मानसिकता
असणाऱ्या लोकांनी एक वाक्य त्यात नव्याने सामील केले आहे, ते म्हणजे “ खरे शिवभक्त
व मर्द मराठा असाल तरच सगळ्यांना हा मेसेज पाठवाल ’’ हे ते होय. त्यामुळे मूळ
स्वरुपात लिहिलेल्या लेखाचा मी धनी आहे, नव्याने वाक्य सामील केलेल्या या लेखाचा
मी धनी नाही त्यामुळे सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे लेख न वाचता त्यात अफरातफर करून
पुढे नव्याने पोस्ट करणाऱ्या या निकृष्ट मानसिकता असणाऱ्या घटकाची मला कीव येते.
निकृष्ट मानसिकतेचा दुसरा घटक म्हणजे राजकारण
हे होय. पर्वाच्याच दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर २०१६ रोजी तथाकथित भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन अरबी समुद्रातील १५.९६ हेक्टर भागात २१० फुट उंची
असणाऱ्या ३६०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे
भूमिपूजन केले. अनेकांनी या स्मारकाला भव्यदिव्य , एकमेव यांसारखी विशेषणे दिली
आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाबरोबरच महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणी नव नव्या प्रकल्पांचे
एकाच दिवशी भूमिपूजन केले. भूमिपूजनाच्या दिवसापर्यंत मिडियाचे वातावरण हे “
भूमिपूजन सोहळ्याच्या ’’ बातम्यांनी व्यापले होते. अखेर २४ डिसेंबरला भूमिपूजन
झाले. अनेक मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याचा निषेध देखील केला. परंतु भूमिपूजन हे
झालेच. पण खरंच ३६०० कोटी रुपये खर्चून, २१० फूट उंची असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या
स्मारकाची महाराष्ट्राच्या जनतेला सध्या आवश्यकता आहे का ? सत्तेच्या स्वार्थासाठी
हिच निकृष्ट मानसिकता सत्तेचे राजकारण वाढवतच चाललेली आहे. आम्ही अभिमानाने
मोबाईलच्या स्क्रीन वर महाराष्ट्राचं आराध्यदैवत म्हणून छत्रपती शिवरायांचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवतो , कपाळी
शानाने चंद्रकोर काढून माथी केशरी फेटा आम्ही बांधतो, अभिमानाने शिवशाहिरांची
व्याख्याने व पुस्तके आम्ही वाचतो, कोणत्याही सोहळ्यात ग्रुपने आम्ही पोरं घसा
ताणून “शिवाजी महाराज कि... “ घोषणा देऊन अनेकांकडून ‘जय’ येण्याची उत्सुकता धरतो,
यांसारखी अशी अनेक उदाहरणे आहेत कि ज्यात आम्ही आमचा शिवाजी राजा पाहतो. मग मोबाईलवरचे
महाराजांचे वॉलपेपर
, चंद्रकोर , फेटा , शिवव्याख्याने, शिवचरित्र व अंगावर शहारे आणणाऱ्या त्या घोषणा
यांची उंची आम्हाला २१० फूट उंची असणाऱ्या नव्याने बांधल्या जाणाऱ्या महाराजांच्या
पुतळ्यापेक्षा इतकी लहान वाटू लागली का ? प्रत्यक्ष स्वरुपात प्रश्न हा फक्त उंचीचाच
नाही आहे तर महाराजांबद्दलच्या भक्तीच्या मानसिकतेचा आहे. आज महाराष्ट्रात अनेक
दुर्गम किल्ले हे अतिशय विस्कळीत अवस्थेत आहेत त्यांची डागडुजी, शेतकऱ्यांच्या
कर्जाचे प्रश्न , गरीबी , शिक्षण यांसारख्या अनेक समस्या आज महाराष्ट्रात वाढत
आहेत आणि अश्या स्थितीत ३६०० कोटींचे शिवस्मारक आम्हाला भव्य वाटते का? ३८६
वर्षांपूर्वीच्या माझ्या शिवरायांच्या दृष्टीतील स्वराज्य हे स्वतःच्या भव्यदिव्य
स्मारकाबद्दलचे नसून सुखी समाधानी रयतेविषयीचे होते. पर्वाच्या दिवशी भूमिपूजन
झालेले स्मारक हे १५.९६ हेक्टर इतक्या जागेत बांधले जाणार आहे. साधा एक बसण्याचा
कठडा बांधायचे म्हंटले तर किती सिमेंट इत्यादी खाली पडते. मग इतके मोठे स्मारक
बांधताना कितीतरी निरुपयोगी गोष्टी या पाण्यात पडून मासे तसेच वनस्पती यांसारख्या
सागरी जीवनसृष्टीला धोका निर्माण होईल यांसारखे अनेक प्रश्न आहेत. परंतु सरतेशेवटी
हा प्रश्न सुजाण मानसिकतेचा आहे. पर्यटनस्थळे हि त्या स्थळाच्या भव्यदिव्यतेवरून
नाही तर , त्या ठिकाणच्या सार्थ संवेदना व शौर्यगाथा यांच्या वैशिष्ट्यांमुळे
अजरामर होत असतात. शिवरायांचे संस्कार हे रयतेच्या स्वराज्य निर्मितीसाठी होते.
शिवरायांच्या याच सुयोग्य संस्कारांचे आपणच एकप्रकारे मारक ठरत आहोत.
महाराष्ट्रातील ३६ ठिकाणांहून निरनिराळ्या नद्यांचे पाणी हे भूमिपूजनासाठी
आणण्यापेक्षा ३६०० कोटी रुपये हे त्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी वापरले असते तर
खऱ्या अर्थाने या नद्या अजून पवित्र झाल्या असत्या. ५० रुपये तिकीट काढून तलवारी
ढाली पाहणाऱ्या पर्यटकांसोबतच प्रत्यक्षात निरनिराळे गड वाटा चढून ट्रेक करणारी
तरुणाई आजही आमचा ‘मावळा’ हा बाणा राखत आहे. मग एवढे असताना देखील पक्षश्रेष्ठींना
सत्तेच्या स्वार्थाअगोदर या सर्व गोष्टींची जाण हि का नाही झाली ? का फक्त आमचे
मुख्यमंत्री सुजाण आहेत असे म्हणणे नाममात्रच राहिले. ३६०० कोटी रुपये खर्चून
शिवरायांचे स्मारक तयार करण्याची मानसिकता हि निकृष्ट दर्जाची आहे. हे
शिवस्मारक नसून खऱ्या अर्थाने आज शिवसंस्कार मारक झाले आहे असेच म्हणावे लागेल.
“भले असेल तुमच्याकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि आयफील टॉवर पण आमचे राजकारणी जरी
कितीही उंच पुतळा बांधत असले तरी मला माहित आहे माझ्या राजाची उंची कि जी, अगणित
आणि अपरंपार आहे.”
Nicely written ...true it is...
ReplyDeleteThank you. Sir
DeleteStrongly Agree Rushi...
ReplyDeleteAaj Maharashtrachya rajkarnatil mansiktela Asha shivvicharanchi nitant garaj aahe
THANK YOU SAMADHAN
DeleteStrongly Agree Rushi...
ReplyDeleteAaj Maharashtrachya rajkarnatil mansiktela Asha shivvicharanchi nitant garaj aahe
i absolutely agree wid you
ReplyDelete